मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ॲड. वैभव खेडेकर यांची ओळख असून, समाजातील गरजू, वंचित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आपत्ती, अपघात तसेच कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत अडखळ, पाले, सडे, वडवली, मंडणगड यांसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमधील गरजू कर्णबधिर लाभार्थ्यांना मोफत श्रवणयंत्रे देण्यात येणार आहेत. श्रवणदोषामुळे संवाद, शिक्षण आणि सामाजिक जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होऊन संबंधित व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक सहजपणे सहभागी होता यावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. समाजातील गरजू व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांनी दिली.













