पती राजन सरमळकर यांच्याकडून पत्नीच्या स्मृतींना उजाळा
दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून स्नेहल भगिनी मंडळाशी जोडलेल्या महिलांचा विशेष गौरव
मालवण | प्रतिनिधी : दिवाळीचा सण म्हणजे आनंदासोबत आपुलकीची नाती जपण्याचा उत्सव. आपलेपणा आणि सामाजिक जाणीव या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन सरमळकर यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त महिलांचा विशेष सन्मान करत आपल्या दिवंगत पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा सरमळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पत्नीच्या कार्यकाळात स्नेहल भगिनी मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांना सन्मानित करून त्यांनी पत्नीने जपलेल्या स्नेहबंधांचा आदरपूर्वक सन्मान केला.
सरमळकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. स्व. सुरेखा सरमळकर यांच्या कार्यकाळात मंडळाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या महिलांना पुन्हा एकत्र आणण्याच्या या उपक्रमाने त्यांच्या स्मृतींना आपुलकीची साद दिली. पत्नीच्या आठवणी जागवत त्यांनी जोडलेली माणसे आणि नाती जपण्याचा भाव या सन्मान सोहळ्यातून व्यक्त झाला. यावेळी महिला मंडळातील सदस्यानी सुरेखा सरमाळकर यांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळातही प्रत्येक वेळी त्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. असे ही उपस्थित महिलांनी सांगितले.
यावेळी शुभांगी सुखी, संगीता तायशेटये, हळदणकर काकी, वैशाली शंकरदास, वंदना कांदळकर, मीना घुर्ये, नीना मुंबरकर, ज्योती राळकर, धनश्री मसुरकर, मनवा मसुरकर, अक्षता सरमळकर, रूपाली फर्नांडिस, सारा फर्नांडिस, सायली नांदगावकर यांसह अन्य महिला उपस्थित होत्या.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मंगल प्रसंगी झालेला हा सन्मान महिलांप्रती आदर व्यक्त करणारा ठरला. त्याचबरोबर सुरेखा सरमळकर यांनी जपलेल्या नात्यांचा धागा तितक्याच आत्मीयतेने जपला जात असल्याचे अधोरेखित झाले.
फोटो : स्व. सुरेखा सरमळकर यांच्या स्मृतींना उजाळा देत स्नेहल भगिनी मंडळाशी जोडलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. (अमित खोत, मालवण)













