२२४ नागरिकांनी घेतला लाभ
आर.सी.सी. देऊळवाडा ग्रुपचा दीपावलीनिमित्त स्तुत्य उपक्रम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
दीपावलीच्या निमित्ताने यशवंत उर्फ बाळू परब पुरस्कृत आणि आर.सी.सी. देऊळवाडा तुळस आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराला तुळस येथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा तब्बल २२४ नागरिकांनी लाभ घेतला.
आज शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी तुळस येथील वाचनालयात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, जिल्हा परिषद माजी सदस्य योगिता परब, पंचायत समिती माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य रतन कबरे, तंटामुक्ती अध्यक्ष नाना राऊळ, पोलीस पाटील सागर सावंत, लीना राऊळ, तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर यांच्यासह आर.सी.सी. देऊळवाडा ग्रुपचे युवा सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रितेश राऊळ म्हणाले की, दीपावलीच्या निमित्ताने युवा ग्रुपने राबविलेली ही अत्यंत चांगली संकल्पना आहे. पुढील काळात जिल्ह्याचा आरोग्य सभापती म्हणून तसेच या तालुक्यातील तुमचा एक सहकारी म्हणून या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील. मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत कशा प्रकारे करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तुळस आरोग्य केंद्रात पुढील महिन्यात जन आरोग्य यात्रेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी या संधीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच रश्मी परब यांनी गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल देऊळवाडा मंडळाचे आभार मानले व त्यांच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. उपसरपंच नारायण कुंभार यांनीही आपल्या मनोगतात मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
यशवंत उर्फ बाळू परब यांनी शिबिराचे महत्त्व विशद करताना या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही गावामध्ये विविध आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. दीपावलीच्या आनंदासोबतच ग्रामस्थांना आरोग्याची अनमोल भेट देणाऱ्या आर.सी.सी. देऊळवाडा ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाला २२४ नागरिकांनी प्रतिसाद देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.











