बांदा:
गोवा ते रत्नागिरी अशी बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलर गाडीवर सातार्डा चेक पोस्ट येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० हजार ७०० रुपये किमतीच्या दारूसह तब्बल १५ लाख रुपयांची गाडी, असा एकूण १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र प्रवीण मयेकर (वय ३० वर्षे, राहणार- अडुर, तालुका- गुहागर, जिल्हा- रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर गाडी (क्रमांक MH08/BK/8181) मधून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूची वाहतूक करत होता. ही दारू गोवा येथून रत्नागिरीच्या दिशेने नेली जात असताना, सातार्डा चेक पोस्ट येथे तैनात असलेल्या पोलिसांनी संशयावरून ही गाडी अडवली.
गाडीची तपासणी केली असता, त्यात ४० हजार ७०० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी दारूसाठ्यासह १५ लाख रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी असा एकूण १५,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी जितेंद्र मयेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.











