चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील धक्कादायक घटना
रिक्षाचालक गंभीर जखमी, कराडमध्ये उपचार सुरू
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरात भटक्या श्वानांचा मुद्दा गाजत असतानाच मोकाट जनावरांचा प्रश्न देखील नागरिकांच्या जीवावर बेतू लागल्याचा एक भयावह प्रसंग समोर आला आहे. रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या उनाड गुरांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, गुरुवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा स्टॉप येथे एका रागीट बैलाने रिक्षाचालकावर भीषण हल्ला केला. या बैलाने रिक्षाचालकाला थेट शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटले. या हल्ल्यात रिक्षाचालक बंड्या झगडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत नगर पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कापसाळ येथील रहिवासी बंड्या झगडे हे नेहमीप्रमाणे आपली रिक्षा स्वागत रिक्षा स्टॉपवर उभी करून प्रवाशांची वाट पाहत होते. याच परिसरात काही मोकाट गुरे फिरत होती. त्यातील एका रागीट बैलामुळे महिला प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन झगडे यांनी त्या बैलाला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाने पुढे सरकल्यानंतर अचानक मागे वळून झगडे यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना थेट शिंगावर घेत रस्त्यावर जोरात आपटले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित रिक्षाचालक आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत धाव घेतली आणि बैलाच्या तावडीतून श्री. झगडे यांची सुटका केली.
या हल्ल्यात श्री. झगडे यांच्या छातीला, बरगड्यांना तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने चिपळूण शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथे हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस किंवा महिने विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. या घटनेची गंभीर दखल घेत चिपळूण तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, संजय जोशी, प्रशांत गोरिवले, राजेंद्र गुढेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथील रुग्णालयात जाऊन बंड्या झगडे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत झगडे कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. मात्र, या घटनेनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करणार कोण? नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कुणाची?
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात गाढवे आणि मोकाट श्वानांचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. मात्र, नगरपालिकेकडून या प्रश्नावर ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बंड्या झगडे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आता गंभीर दुखापतीमुळे त्यांना कामावर जाता येणार नाही. एकीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, तर दुसरीकडे महागड्या वैद्यकीय उपचारांचा खर्च, अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडले आहे. मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एका कष्टकरी रिक्षाचालकावर ही वेळ ओढवली, असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
या घटनेला जबाबदार कोण? जखमी रिक्षाचालकाच्या उपचाराचा खर्च कोणी करायचा? त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेणार? असे थेट सवाल संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांनी उपस्थित केले आहेत. नगरपालिकेने या घटनेची जबाबदारी स्वीकारून बंड्या झगडे यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय उपचारांचा खर्च उचलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अन्यथा नगरपालिकेविरोधात उग्र आंदोलन!
मोकाट गुरे, गाढवे आणि श्वान यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी. येत्या काही दिवसांत नगरपालिकेने या प्रश्नावर ठोस पावले उचलली नाहीत, तर नगरपालिका प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिलीप खेतले यांनी दिला आहे.
एका कष्टकरी रिक्षाचालकाला मोकाट बैलाच्या हल्ल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते, त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळते आणि तरीही शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायम राहतो, ही चिपळूण शहरासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच नगरपालिकेला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.












