लांजा पंचायत समितीची आमसभा २५ नोव्हेंबर रोजी

लांजा (प्रतिनिधी) : लांजा पंचायत समितीची आमसभा बुधवार २५ नोव्हेंबर रोजी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता लांजा येथील पाटीदार भवन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या आमसभेच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील नागरिकांना आपल्या परिसरातील विविध समस्या, विकासकामांबाबतच्या सूचना, प्रलंबित प्रश्न तसेच तक्रारी प्रशासनासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या, सूचना, निवेदने अथवा तक्रारी लेखी स्वरूपात पंचायत समिती लांजा कार्यालयाकडे २० नोव्हेंबर पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमसभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना विहित मुदतीत लेखी स्वरूपात सादर करून आमसभेच्या कामकाजात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंचायत समिती लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.