मृत तरुण रघुवीर मसुरकर आडवली तांबळवाडी, ता.मालवण( जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी
लांजा (प्रतिनिधी): आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या लक्झरी बस आणि सोळा चाकी ट्रकच्या भीषण अपघातातील गंभीर जखमी झालेल्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रघुवीर मसुरकर या तरुणाचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सोळा चाकी ट्रकने पुढे असलेल्या खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण २३ जण जखमी झाले होते. तर अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अपघातात रघुवीर बाळकृष्ण मसुरकर (वय ३३, रा.आडवली तांबळवाडी, ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग) हा जखमी झाला होता. त्याच्या उजव्या बरगडीला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघातप्रकरणी ट्रकचालक दिलावर सुमार खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर रघुवीर मसुरकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१) अन्वये अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या अपघातातील बंडू बाबी दाभोळकर (वय ५८, रा.गवाणे दाभोळकरवाडी, ता.लांजा) हे देखील गंभीर जखमी झाले होते, त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.












