सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांचा चतुरंग निवासी अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
जीवनप्रवासातील अनुभवांतून दिले यशाचे मंत्र
चिपळूण (संतोष सावर्डेकर) : “कोणत्याही क्षेत्रात पुढे जाताना अडचणी येणारच; मात्र एखाद्या प्रवासात मागे फिरण्यात कधीही अपयश नसते. अनेकदा मागे फिरून नव्याने सुरुवात केल्यानंतर आपण घेतलेला निर्णय योग्य होता, याची जाणीव कालांतराने होते. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी ठेवा आणि प्रयत्न करणे कधीही सोडू नका,” असे प्रेरणादायी प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने वहाळ येथे आयोजित निवासी अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांशी साधलेल्या मनमोकळ्या संवादात ते बोलत होते.
सध्या सुनील बर्वे आपल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ या नाटकाच्या दौऱ्यावर असतानाही चतुरंग प्रतिष्ठानसोबत असलेले जुने ऋणानुबंध आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या आग्रहाला मान देत त्यांनी खास वेळ काढून वहाळ येथे उपस्थिती लावली. सभागृहात सुनील बर्वे यांचे आगमन होताच टीव्ही आणि नाटकांच्या माध्यमातून परिचित असलेल्या आपल्या लाडक्या कलाकाराला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. चतुरंगच्या परंपरेनुसार अत्तरकुपी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दिवाळी पहाट निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकालही सुनील बर्वे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. आपल्या स्पर्धेतील क्रमांकाची घोषणा त्यांच्या तोंडून ऐकणे आणि त्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारणे हा विद्यार्थ्यांसाठी विशेष आनंदाचा क्षण ठरला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुनील बर्वे यांनी आपल्या कलाप्रवासातील अनेक आठवणी उलगडल्या. दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही निश्चित विचार नव्हता. मात्र, ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्याशी झालेली ओळख त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यानंतर नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तिन्ही माध्यमांतून काम करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “आपण ज्या माणसांच्या सहवासात असतो, त्यांच्याकडूनच नकळत घडत असतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या माणसांमधील चांगले गुण नेहमी टिपण्याचा प्रयत्न करा. आपले वागणे आणि विचार चांगले असतील, तर आपणही निश्चितच एक चांगले माणूस म्हणून घडू शकतो.” त्याचबरोबर आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर केवळ विधायक, सकारात्मक आणि चांगल्या कामांसाठी करण्याचा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला.
यानंतर विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी, नाटकांच्या प्रवासाविषयी तसेच विविध सहकलाकारांसोबतच्या अनुभवांविषयी उत्सुकतेने प्रश्न विचारले. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्या विशेष गाजलेल्या ‘हर्बेरियम’ या नाट्यउपक्रमामागील संकल्पना आणि त्याचा प्रवासही विद्यार्थ्यांसमोर मांडला. वनस्पतीशास्त्रातील संकल्पनेवरून प्रेरित झालेल्या ‘हर्बेरियम’ या उपक्रमांतर्गत गेल्या दीडशे वर्षांतील जुन्या नाटकांचा अभ्यास करून त्यातून निवडक पाच नाटकांची निवड करण्यात आली. या पाच नाटकांचे देशभरातील विविध ठिकाणी केवळ पंचवीस प्रयोग सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय आठवणीविषयी विचारले असता, ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे आणि ‘हर्बेरियम’ उपक्रमाचे थेट मंगेशकर कुटुंबीयांकडून झालेले कौतुक ही आपल्या कलाप्रवासातील अत्यंत मोलाची पावती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
संवादाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देताना त्यांनी भविष्याचा आणि कुटुंबाचा विचार करून प्रत्येक निर्णय घेण्याचे आवाहन केले. आई-वडील नेहमीच योग्य विचार करण्याची शिकवण देत असतात. त्यांच्या अनुभवातून मिळालेल्या मार्गदर्शनाचा विचार करून आयुष्यात पुढे जा आणि कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्नांची कास सोडू नका, असे त्यांनी सांगितले. कलेचा प्रवास, अनुभवांची शिदोरी, आयुष्यातील निर्णयांचे महत्त्व आणि माणूस म्हणून घडण्याची शिकवण अशा विविध विषयांवर रंगलेला हा संवाद विद्यार्थ्यांसाठी केवळ एका प्रसिद्ध अभिनेत्याशी झालेली भेट नव्हती, तर आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.













