चालत्या एल.पी.वाहनातून आकडी येऊन रस्त्यावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

पन्हळी खुर्द येथील घटना; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू

मंडणगड प्रतिनिधी : चिरे वाहतूक करून परतत असताना अचानक आकडी आल्याने चालत्या एल.पी. वाहनाचा दरवाजा उघडून रस्त्यावर पडलेल्या तरुणाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. प्रशांत सुंदर चिरगुटकर (वय ३६, रा. शेनाळे) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज रविवारी दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पन्हळी खुर्द येथे घडली.
याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, चालक मोहन रामा जाधव (वय ४१, रा. साळीवाडा) हे आपल्या ताब्यातील एलपी वाहनातून चिरे वाहतूक करून परतत होते. त्यावेळी वाहनात असलेला गाडी चा क्लिनर प्रशांत चिरगुटकर याला अचानक फिट आली. यामुळे त्याच्या बाजूकडील दरवाजा उघडला गेल्याने तो चालत्या वाहनातून थेट रस्त्यावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी प्रशांत याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, भिंगळोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी प्रदीप जाधव (वय ४०, रा. पन्हळी खुर्द) यांच्या तक्रारीवरून वाहनचालक मोहन जाधव वय ४१ राहणार साळीवाडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.