रत्नागिरी ः प्रतिनिधी
महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून गॅस कनेक्शनचे बिल ॲक्टीव्हेट करण्यासाठी रिचार्ज करावे लागेल अशी बतावणी करत अज्ञाताने वृध्देची तब्बल साडे पाच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना बुधवार 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.40 ते शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वा.कालावधीत कर्ला-कारेकरवाडी येथे घडली आहे.
याबाबत जिक्रिया आदम फणसोपकर (76,रा.कर्ला कारेकरवाडी,रत्नागिरी) यांनी शनिवार 14 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2026 या कालावधीत अज्ञाताने फिर्यादी वृध्देच्या मोबाईलवर फोन केला. आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असून तुमचे गूस कनेक्शनचे बील भरलेले आहे. तुम्हाला बील ॲक्टीव्हेट करण्यासाठी 10 रुपयाचा रिचार्ज मारावा लागेल असे सांगून फिर्यादी वृध्देच्या व्हॉटसॲपवर महानगर गॅस नावाची ॲप्लीकेशन फाईल पाठवली.
फिर्यादी जिक्रिया फणसोपकर यांनी ती ॲप्लीकेशन फाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये फिर्यादी यांनी त्यांचे पूर्ण नाव भरुन त्या ॲप्लीकेशनवर असणारे सर्व कॉलम ओके करत पूर्ण भरले. त्यानंतर काही वेळाने फिर्यादीच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून तब्बल 5 लाख 56 हजार 691 रुपये ऑनलाईन पध्दतीन काढण्यात आल्याचा त्यांना मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी वृध्द महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66,(क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.













