म्हाप्रळ फाटा ते जेट्टी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात; मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

१५ डिसेंबरपर्यंत अपूर्ण काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराचे आश्वासन; परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त

मंडणगड (प्रतिनिधी): म्हाप्रळ फाटा ते जेट्टीपर्यंतच्या रस्त्याच्या प्रलंबित कामाला अखेर सुरुवात झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड तालुक्याच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाचा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने लावून धरला होता. अखेर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.नवनिर्माण सेनेचे मंडणगड तालुका उपाध्यक्ष मुस्तकीन करविणकर, म्हाप्रळ विभाग अध्यक्ष अवधूत जाधव यांच्यासह अभिषेक शिगवण, अमित दादा टक्के, प्रशांत घाग, देवेंद्र बहुतुले, सुहास कदम, सौरभ रेवाले, अभिषेक रेवाले, किशोर कानसरे, तेजस घाग, संदीप रेवाले तसेच अन्य महाराष्ट्र सैनिकांनी या रस्त्याच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधून घेत रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

आता या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, सुरुवातीला रस्त्याची साफसफाई करणे, खड्डे भरणे आणि उर्वरित अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

जनतेच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे. केवळ आश्वासने न देता जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करणे आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे, हीच मनसेची भूमिका असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.