देवगड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाचा ३५ वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

साधना आणि सेवा या जीवनाला दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी – शोभा दीदी

देवगड : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या देवगड सेंटरचा ३५ वा वर्धापन दिन विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गोवा-सिंधुदुर्ग विभागाच्या संचालिका शोभा दीदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन करताना जीवनामध्ये साधना आणि सेवा यांचे महत्त्व अधोरेखित केले.

मार्गदर्शन करताना शोभा दीदी म्हणाल्या की, मनुष्य जीवनामध्ये चांगले, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर साधना आणि सेवा या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व दिले पाहिजे. आपण आपली साधना मनापासून आणि सेवा प्रामाणिकपणे केली, तर निश्चितच आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. साधनेतून आत्मिक शक्ती मिळते, तर सेवेतून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी साधना व सेवेला आपल्या आचरणात स्थान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या वर्धापन दिनानिमित्त सकाळपासूनच केंद्रामध्ये साधना, आध्यात्मिक चिंतन तसेच ईश्वरीय सेवाकार्य कशा पद्धतीने करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतील ब्रह्मकुमारी केंद्रांच्या संचालिका दीदींसह संध्या दीदी, मेघा दीदी, तालुक्यातील ब्रह्मकुमारी दीदी, बहिणजी तसेच विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.