युथ फोरमच्या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
मूव्ही पोस्टर ‘नटसम्राट’ची रांगोळी ठरली सर्वोत्तम
नाशिकची तृप्ती अहिरे द्वितीय
१६ नोव्हेंबरपर्यंत रांगोळी प्रदर्शन खुले
देवगड/ प्रतिनिधी
युथ फोरम, देवगड यांच्यावतीने देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत रत्नागिरीच्या राहुल कळंबटे याने प्रथम क्रमांक पटकाविला. पोट्रेट प्रकारात ‘मूव्ही पोस्टर’ या विषयावर आधारीत या स्पर्धेत राहुल कळंबटे यांनी ‘नटसम्राट’ या मराठी चित्रपटाचे पोस्टर विविध रंगांच्या रांगोळीमधून हुबेहुब रेखाटत अव्वल स्थान मिळविले. स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्रातील दिग्गज रांगोळी कलाकारांनी रेखाटलेल्या रांगोळीचे भव्य प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून प्रदर्शनाला देवगडवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. अविनाश माणगांवकर व भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक मधुकर नलावडे, देवगड नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. अनुश्री पारकर, उद्योजक श्रीकांत जोईल, युथ फोरम संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे. यात रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, अमरावती, मालेगाव, परभणी, हिंगोली, गोंदिया, हिंगणघाट, पनवेल, तसेच सिंधुदुर्गमधील देवगड, कणकवली, वेंगुर्ला, मालवण या भागातील एकूण ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक तृप्ती अहिरे (नाशिक), तृतीय क्रमांक विलास रहाटे (रत्नागिरी) यांनी मिळविला. तर उत्तेजनार्थ व मांक प्रमोद आर्वी (पुणे), द्वितीय क्रमांक तन्मेष परब (गोवा), तृतीय क्रमांक साई पारकर (मालवण) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण स्वप्नील राणे व उदय रावल यांनी केले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख १५ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला रोख १२ हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला रोख १० हजार रूपये व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५ हजार रूपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी रांगोळी कलाकाराला आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युथ फोरमच्या टीमने विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, देवगडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाला नागरिकांनी, कलाप प्रेमींनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी केले आहे.













