अभिषेक, महाप्रसाद अन् दशावतार नाट्यप्रयोगाची पर्वणी!
रेडी येथे श्री देव रामपुरुष यांचा वार्षिक जत्रोत्सव रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी श्री देव आदिनारायण आणि श्री देव रामपुरुष या देवतांवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री पालखी सोहळा पार पडणार असून, त्यानंतर मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या जत्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामपुरुष मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.












