भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सप्ताहानिमित्त ; ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे यांचा सन्मान! महसूल क्षेत्रातील योगदानाची घेतली दखल

मंडणगड (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक, महान स्वातंत्र्यसैनिक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिन सप्ताहानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी व जिल्हा अनुसुचित जाती मोर्चा यांच्यावतीने तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १६ नोव्हेंबर २०२६ रेजी तालुक्यातील पालवणी सजा येथील ग्राम महसूल अधिकारी रतन साळुंखे यांचा महसूल विभागातील कर्तव्यनिष्ठ कार्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास देव्हारेचे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, पाचरळचे ग्राम महसूल अधिकारी रमेश बर्दापुरे ग्राम महसूल अधिकारी सिद्धी भोईर उपस्थित होते.
महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. नागरिकांना विविध शासकीय सेवा, महसूलविषयक कामे तसेच प्रशासकीय प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी पार पाडतात. या पार्श्वभूमीवर रतन साळुंखे यांनी शासकीय कर्तव्य बजावताना शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान तसेच वनराई बंधारे उभारणीसारख्या जलसंधारणाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्राम महसुल अधिकारी रतन साळुंखे यांच्या कार्याचे कौतुक करताना अभिजीत देवळेकर म्हणाले की, जबाबदारीने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणे आवश्यक आहे. शासकीय सेवेत कार्यरत असताना नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या रतन साळुंखे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगीतले. फोटो ओळी ग्राम महसुल अधिकारी रतन साळुंखे यांचा गौरव करताना अभिजीत देवळेकर व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर