चिपळूण (प्रतिनिधी) : शहरानजीकच्या वालोपे येथे ३३ वर्षीय तरुणाचा अज्ञाताने डोक्यात चिरा घालून हत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तर अधिक तपासासाठी तसेच ठसेतज्ञ शानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून अज्ञाताविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवनाथ बबन कांबळी (३३, रा. वांगी, कडेगाव- जिल्हा सांगली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण लोटे येथील एका कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी वालोपे रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती येथील ग्रामस्थांना समजताच त्याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. तो आपल्या एका नातेवाईकाकडे वालोपे येथे राहत असल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारे समोर आले आहे. तसेच नवनाथला दारू पिण्याचे व्यसन होते. दरम्यान, सोमवारी रात्री घराबाहेर पडला. मात्र, तो घरी आला नाही.
परंतु मंगळवारी सकाळी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर नवनाथचा मृतदेह आढळून आल्याने तसेच तिथे चिरा असून अज्ञाताने नवनाथच्या डोक्यात चिरा घालून खून केला असल्याचे समोर येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. अज्ञाताचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा कामाला लागली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.













