रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक; भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांचे बैठकीत नियोजन
निलेश जाधव / देवरूख:
संगमेश्वर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गांभीर्याने घेण्यात आला आहे. मार्लेश्वर येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची सोमवारी तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीत मार्लेश्वर तीर्थक्षेत्रातील वाहनतळ ते मंदिर आणि मंदिरापासून धबधब्यापर्यंत सुमारे ११०० मीटर परिसरात जाळीदार कुंपण उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, मंदिर परिसरातील डोंगराळ भौगोलिक रचना, उंच कडे, आणि काही ठिकाणी असलेली असुरक्षित जागा यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. काही दिवसांपूर्वी मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथून दर्शनासाठी आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला होता.
या दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधत भाविकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. केवळ दुर्घटना घडल्यानंतर पाहणी आणि बैठका घेण्यापेक्षा भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत मार्लेश्वर तीर्थक्षेत्रातील सुरक्षेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाविकांचा वावर असलेल्या संवेदनशील परिसरात सुमारे ११०० मीटर लांबीचे जाळीदार कुंपण उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देवरूख सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, वाहनांच्या पार्किंगपासून मंदिरापर्यंत ९०० मीटर आणि मंदिरापासून धबधब्यापर्यंत २०० मीटर असा एकूण १,१०० मीटर लांबीचा परिसर मजबूत जाळीच्या कुंपणाने सुरक्षित केला जाणार आहे. या कुंपणामुळे अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच, श्री मार्लेश्वर मंदिर ज्या नैसर्गिक गुहेत आहे, त्या गुहेच्या छताचे दगडही निसटत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी गुहेच्या छताला ‘स्टीलडोम’ बसवण्याचाही प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू आहे.
मार्लेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी परिसरातील धोकादायक ठिकाणांची ओळख करून आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. जाळीदार कुंपणाबरोबरच संभाव्य धोकादायक भागांमध्ये सूचना फलक, सुरक्षित मार्गदर्शन आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्लेश्वर हे केवळ धार्मिक पर्यटनस्थळ नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षितता जपणे ही प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांची महत्त्वाची जबाबदारी आहे. ११०० मीटर परिसरात जाळीदार कुंपण उभारण्याच्या नियोजनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे. मात्र, हे नियोजन प्रत्यक्षात किती लवकर पूर्णत्वास जाणार, कामाचा दर्जा कसा राखला जाणार आणि इतर धोकादायक ठिकाणी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांचे लक्ष लागले आहे.











