देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS) विभागाच्यावतीने सोनवडे येथे आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिरात दिनांक १४ व १६ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गाव परिसरात पाच बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. तसेच सोनवडे हायस्कूल परिसराची स्वच्छता व शाळेच्या आवारात परसबाग तयार करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या श्रमदान उपक्रमांना सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे, गावचे पोलीस पाटील अनंत जोशी, माजी सरपंच अंकुश राऊत, ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती मोहिरे, संस्था कोषाध्यक्ष योगेश शिंदे, निवृत्त कलाशिक्षक विष्णू परीट, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रा. मयुरेश राणे, प्रा. वसंत तावडे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, सहाय्यक हेमंत कदम, अमोल वेलवणकर, तसेच विशाल जाधव यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. श्रमदान उपक्रमादरम्यान सोनवडे गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांनी स्वयंसेवकांना प्रोत्साहन देत श्रमदानाच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थी स्वयंसेवक व ग्रामस्थ यांनी केलेल्या श्रमदानातून निर्माण झालेल्या कार्याचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.











