रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप
खेड | प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील कळबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील रहिवासी कैलास यादव यांनी रुग्णालय प्रशासनावर थेट आरोप करत निकृष्ट व वापरण्यास अयोग्य औषधांचा पुरवठा होत असल्याची तक्रार केली आहे. या आरोपांमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील औषध खरेदी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.

कैलास यादव हे गेल्या पाच वर्षांपासून रक्तदाब, मधुमेह आणि रक्त पातळ करण्यासाठी नियमित उपचार घेत आहेत. ते दरमहा कळबणी उपजिल्हा रुग्णालयातून औषधे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 25 मे 2026 रोजी त्यांना नेहमी दिल्या जाणाऱ्या इकोस्प्रिन गोळीऐवजी लेस्प्रीन कंपनीच्या गोळ्या देण्यात आल्या. मात्र या गोळ्यांची अवस्था संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोळ्या खराब झालेल्या असून त्या सेवनासाठी योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत कैलास यादव यांनी 27 मे रोजी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. सुपरवायझर सौ. हळदणकर यांना प्रत्यक्ष गोळ्या दाखविण्यात आल्या. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सदरे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. संबंधित औषधांबाबत शंका व्यक्त करण्यात आली असतानाही पुढे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
विशेष म्हणजे, रक्त पातळ करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा संबंध थेट रुग्णाच्या जीवाशी असतो. अशा औषधांचा दर्जा निकृष्ट असल्यास किंवा ती खराब अवस्थेत रुग्णांपर्यंत पोहोचल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा केवळ निष्काळजीपणाचा नव्हे तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
रुग्णाने वेळेत तक्रार करूनही जर संबंधित औषधांचा साठा तपासण्यात आला नसेल, प्रयोगशाळा चाचणी करण्यात आली नसेल किंवा पुरवठादार कंपनीची चौकशी झाली नसेल, तर यामागे नेमके कोणाचे संरक्षण केले जात आहे, असा सवालही उपस्थित होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून संपूर्ण चौकशी करावी, संबंधित औषधांचा साठा जप्त करून नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा आरोग्य व्यवस्थेचा पाया असतो. मात्र रुग्णांच्या जीवाशी संबंधित औषधांबाबत असे आरोप समोर येत असतील, तर ते अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता संभाव्य जीवितहानीचा इशारा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. आता आरोग्य विभाग या गंभीर आरोपांची कितपत दखल घेतो आणि जबाबदारांवर काय कारवाई करतो, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.












