२८ व २९ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे आयोजन
तरुणाईच्या विचारांना मिळणार अभिव्यक्तीचे व्यासपीठ
साहित्य दिंडी, कवी संमेलने, परिसंवाद, प्रकट मुलाखत आणि ग्रंथप्रदर्शन
प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. देवदत्त परुळेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
अमित खोत | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नव्या पिढीच्या विचारांची, सर्जनशीलतेची आणि अभिव्यक्तीची जोड देणारा भव्य साहित्यिक सोहळा मालवणनगरीत रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानित सहकार्याने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने शनिवार, २८ व रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘माझा काळ, माझी भूमिका’ हे संमेलनाचे मध्यवर्ती आशयसूत्र असून, बदलत्या काळातील तरुणाईचे विचारविश्व, सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न, साहित्याची बदलती रूपे आणि नव्या पिढीच्या अभिव्यक्तीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर,
अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. ज्योती तोरसकर, ॲड. प्रमोद देसाई, ॲड. संदीप निंबाळकर, शैलेश खांडाळेकर, सिद्धेश सावंत, डॉ. सुमेधा नाईक, संजय आचरेकर आदी उपस्थित होते.
प्रा. बांदेकर म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘महात्मा जोतिबा फुले साहित्यनगरी’मध्ये हे दोन दिवसीय संमेलन संपन्न होणार आहे. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रीरंजन आवटे संमेलनाध्यक्षपद भूषविणार असून, कोल्हापूर येथील प्रसिद्ध कलावंत ऋचिका खोत यांच्या हस्ते रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. देवदत्त परुळेकर सांभाळणार आहेत.
साहित्य दिंडीतून मालवणनगरीत घुमणार साहित्याचा जागर!
संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मालवण शहरातून भव्य साहित्य दिंडी काढण्यात येणार आहे. डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ होईल. शिवाजी वाचन मंदिर, भरड, बाजारपेठ, नगर वाचन मंदिर आणि टोपीवाला हायस्कूल मार्गे ही दिंडी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे पोहोचेल. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, साहित्यप्रेमी, लोककलावंत तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी या दिंडीत सहभागी होणार आहेत. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही दिंडी संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
साहित्यिकांचा सन्मान; काव्यसंमेलनातून शब्दांना मिळणार नवा आविष्कार!
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कथाकार लुई फर्नांडिस साहित्य मंचावर मालवण परिसरातील साहित्यिकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात यापूर्वी आयोजित साहित्यविषयक प्रश्नमंजुषा, शब्दकोडे आणि बॅ. नाथ पै जीवनदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन रंगणार आहे. स्थानिक कवी-कवयित्रींना आपल्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणाची संधी मिळणार आहे. रात्री ९ वाजता प्रसिद्ध कलावंत ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांचा ‘वारी आडवाटेच्या विठोबाची…’ हा सामाजिक आशय असलेला संगीतमय मराठी कलाविष्कार सादर होणार आहे.
साहित्य, समाज आणि बदलत्या काळातील तरुणाईच्या विचारांवर मंथन!
रविवार, २९ नोव्हेंबर रोजी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र खांडाळेकर यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य उद्घाटन समारंभात विविध साहित्यिक, मान्यवर आणि जिल्ह्यात साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. याचवेळी प्रा. वासंती किणीकर लिखित ‘क्रांतीज्योती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.
संमेलनातील विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लेखक डॉ. रुपेश पाटकर यांची ‘माझं जगणं माझं वर्तमान’ या विषयावरील प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. व्यक्तिगत अनुभव, सामाजिक वास्तव आणि समकालीन जीवनातील विविध पैलूंवर या मुलाखतीतून विचारमंथन होणार आहे.
त्यानंतर ‘माझे लेखन आणि आजचा काळ’ या विषयावर परिसंवाद रंगणार आहे. ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. विनायक होगाडे, प्रदीप कोकरे आणि सरिता पवार सहभागी होणार आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीत साहित्यिकांची भूमिका, लेखनाची जबाबदारी आणि समकालीन साहित्याचे विविध पैलू यांवर चर्चा होणार आहे.
‘जेन झी’च्या भाषेवर रंगणार वादसंवाद!
आजच्या तरुणाईची बदलती भाषा, संवादशैली आणि डिजिटल युगातील अभिव्यक्ती यांचा वेध घेणारा ‘जेन झी ची भाषा : नवा आविष्कार की घसरण?’ हा वादसंवाद संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. यामध्ये ॲड. सहिष्णू पंडित, दर्श सामंत आणि ॲड. सृजन वाटवे सहभागी होणार आहेत. नव्या पिढीची भाषा ही सर्जनशीलतेची नवी दिशा आहे की भाषिक मूल्यांपुढील आव्हान, यावर विविध दृष्टिकोनांतून चर्चा होणार आहे.
यानंतर स्नेहा कदम यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे युवा कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. युवा कवींच्या कल्पनाशक्तीला, संवेदनशीलतेला आणि सामाजिक जाणिवांना या संमेलनातून अभिव्यक्ती मिळणार आहे. सायंकाळी समारोप समारंभाने दोन दिवसीय साहित्य सोहळ्याची सांगता होईल.
विविध साहित्यिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा होणार गौरव!
या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथालेखन, काव्यरसग्रहण, अभिवाचन, वक्तृत्व, काव्यवाचन, साहित्ययात्री रील, ऑनलाइन प्रश्नमंजुषा तसेच महिलांसाठी उखाणे अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थी आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धांतील विजेत्यांना संमेलनादरम्यान पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, लेखनकौशल्य विकसित करणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
ग्रंथप्रदर्शनातून साहित्यप्रेमींसाठी पुस्तकांचा अनमोल ठेवा!
संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तकांचे विशेष प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय विविध प्रकाशकांची तसेच साहित्यिकांची पुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास, संस्कृती आणि वैचारिक साहित्य अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा परिचय साहित्यप्रेमींना होणार आहे. विद्यार्थी, युवक, शिक्षक आणि वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
साहित्यिक वारशाला नव्या पिढीच्या सर्जनशीलतेची जोड!
सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्य, लोककला, संस्कृती आणि वैचारिक चळवळींचा समृद्ध वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन करतानाच नवोदित साहित्यिकांना संधी देणे, तरुणाईला वाचन आणि लेखनसंस्कृतीशी जोडणे, ज्येष्ठ व युवा साहित्यिकांमध्ये विचारांची देवाणघेवाण घडवून आणणे आणि सामाजिक प्रश्नांकडे साहित्याच्या माध्यमातून पाहण्याची दृष्टी विकसित करणे, या व्यापक उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
केवळ साहित्यिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता नव्या पिढीच्या विचारांना दिशा देणारे, त्यांच्या अभिव्यक्तीला बळ देणारे आणि जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीला नवी ऊर्जा देणारे हे संमेलन ठरावे, असा आयोजकांचा प्रयत्न आहे.
या दोन दिवसीय साहित्य सोहळ्यात जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी, विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर आणि संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











