शिरगाव परिसरात दोन दिवस वाय-फाय सेवा बंद; नागरिकांची मोठी गैरसोय!

केबल वारंवार तुटत असल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत

शिरगाव (प्रतिनिधी) :
शिरगावसह साळशी, चाफेड आदी ग्रामीण भागात गेल्या दोन दिवस वाय-फाय इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मोबाईल टॉवरवरून मिळणारे नेटवर्क स्पीड स्लो मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी वाय-फाय सुविधा घेण्यास पसंती दिली होती. त्यामुळे या ग्रामीण भागातील नागरिकांना इंटरनेटची चांगली सुविधा उपलब्ध झाली होती.

सध्या देवगड-निपाणी रस्त्याचे शिरगाव-धोपटेवाडी येथे काम सुरू असल्याने रस्त्याच्या खोदकामादरम्यान इंटरनेटच्या केबल वारंवार तुटत आहेत. परिणामी, वाय-फाय सेवा वारंवार खंडित होत असून ग्राहकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वाय-फाय सेवा बंद असल्याने टीव्ही सेवा, विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास तसेच विविध ऑनलाइन कामकाज ठप्प झाले आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे.

. तरी शिरगावसह साळशी, चाफेड भागातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.