अज्ञात वाहनाच्या धडकेने लांजा-राजापूर महामार्गावर बिबट्याचा मृत्यू

राजापूर | प्रतिनिधी : लांजा ते राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर शनिवारी दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास एका बिबट्याचा मृतदेह आढळला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

पहाटे ३:४० च्या सुमारास पोलीस निरीक्षक (राजापूर) श्री. अमित यादव यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता लांजा-राजापूर महामार्गावर उजव्या बाजूला अंदाजे ३ ते ४ वर्षांचा नर बिबट मृतावस्थेत पडलेला दिसला.

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे बिबट्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी (राजापूर) श्री. वैभव चोपडे यांच्यामार्फत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार, वनपाल श्री. जयराम बावधने, वनरक्षक श्री. विक्रम कुंभार आणि श्री. नीलेश म्हादये यांनी सहभाग घेतला.

या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी किंवा कोणत्याही वन्यप्राण्याला अडचण आल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१९२६ किंवा ९४२१७४१३३५) संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी) श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.