पोलिसांनी अवघ्या काही तासांत केले जेरबंद ; ५ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त
सावंतवाडी :
सावंतवाडी बस स्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना एका ७६ वर्षीय वृद्ध प्रवाशाच्या खिशातील पैशाचे पाकीट चोरल्याप्रकरणी कर्नाटक येथील दोघा जणांना सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. मिथुन आकाश बोवी (वय १९) आणि त्याची आई लक्ष्मी आकाश बोवी (वय ३८, रा. मंगळुरु, कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वेर्ले मर्गजवाडी येथील ७६ वर्षीय वृद्ध प्रवासी विठ्ठल फटू मर्गज यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विठ्ठल मर्गज हे आपल्या पत्नीसोबत डॉक्टरांकडे तपासणीसाठी सावंतवाडीत आले होते. तपासणीनंतर ते आपल्या गावी जाण्यासाठी सावंतवाडी बस स्थानकात आले आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी ते वेर्ले या बसमध्ये चढत होते.
त्याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन मागे उभ्या असलेल्या संशयितांनी त्यांच्या खिशातील साडेपाच हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट हातोहात लांबवले. बसमध्ये कंडक्टरला तिकिटाचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला असता पाकीट चोरीला गेल्याचे विठ्ठल मर्गज यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस स्थानक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांच्या ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तक्रारदार बसमध्ये चढत असताना त्यांच्या मागे दोन संशयित व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच सीसीटीव्ही फुटेजमधील दोघांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ते कर्नाटकच्या मंगळुरु येथील असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी संशयित तरुण मिथुन याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तक्रारदाराचे चोरीला गेलेले पाकीट व संपूर्ण रक्कम सुखरूपरित्या आढळली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाई सुरू केली असून, या माता-पुत्राचा अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.













