अभिनेते अनासपुरे यांची गुहागर पंचायत समितीला भेट

गुहागर/प्रतिनिधी- प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज गुहागर पंचायत समिती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. पंचायत समितीच्या सभापती दालनात झालेल्या या भेटी दरम्यान गुहागर तालुक्यातील नदितिल गाळ काढणे आणि धरणातील गाळ काढणे यावरती सविस्तर चर्चा झाली.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकास कामांबाबत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत माहिती जाणून घेतली.सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मकरंद अनासपुरे यांच्या या भेटीमुळे पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी नावाजलेल्या ‘नाना फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा अनुभवही यावेळी उपस्थितांसोबत शेअर केला. या प्रसंगी नगरसेवक अमरदिप परचुरे, सागर गुजर आदि पंचायत समितीचे पदाधिकारी, आणि कर्मचारी उपस्थित होते. सभापती प्रणव पोळेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी वेळात वेळ काढून पंचायत समितीला भेट दिल्याबद्दल आभार मानले.