हिंदू राष्ट्राला इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये! – पालकमंत्री नितेश राणे

ओरोस येथे पत्रकारांशी संवाद; संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा

सिंधुदुर्ग : जगभरात मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरण सुरू असल्याचा दावा करत हिंदू समाजाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. प्रत्येकाला इस्लाम स्वीकारायला लावण्याचे प्रयत्न होत असतील, तर ते जबरदस्तीने असोत किंवा अन्य कोणत्याही मार्गाने, त्याबाबत हिंदू समाजाने सतर्क राहणे आवश्यक आहे. आपला देश हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्राला कुठल्याही पद्धतीने इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये, याची काळजी संपूर्ण हिंदू समाजाने घेतली पाहिजे, असे मत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केले. ओरोस येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी इस्लामीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, जगातील विविध देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष आपण पाहत आहोत. जगातील अनेक देशांनी या विषयाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या देशातील हिंदू समाजानेही या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

चायना एनसीने फोटो काढण्याच्या प्रकरणावरून माफी मागितली असताना संजय राऊत यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. ते आमच्यासाठी दैवत आहेत. संबंधितांनी आता माफी मागितली आहे. कुठलाही कडवट शिवसैनिक अशा प्रकारची चूक मुद्दामहून करणार नाही.

मात्र, संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या उबाठा पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेल्या प्रतारणेबद्दल माफी मागायला हवी. त्यांनी तर ३०० ते ५०० दिवस नव्हे, तर नाक घासून माफी मागितली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे ‘हिंदूहृदयसम्राट’ हा शब्द लिहिण्यापासूनही हे लोक घाबरत होते. त्यामुळे दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांना बदनाम कसे केले, त्यांच्या विचारांच्या विरोधात कसे वागले, याबद्दल संजय राजाराम राऊत यांनी किती वेळा माफी मागायला हवी, याची भूमिका मांडावी, असे आव्हानही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.