वन्यप्राण्यांसाठी वनक्षेत्रात पाणी व चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक खाद्यस्रोत उपलब्ध व्हावेत, तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी सावंतवाडी वन विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती दलाची (District Level Task Force) स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून वनक्षेत्रातील जलस्रोतांचे संवर्धन, वनराई बंधाऱ्यांची निर्मिती, वनाग्नी प्रतिबंध आणि नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांचे संरक्षण यावर विशेष भर देण्यात येत आहे.

या कृती दलाच्या अध्यक्षपदी उपवनसंरक्षक, सावंतवाडी वन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक १ हे सदस्य सचिव, तर सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक २ हे सहसदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, आंबोली, कुडाळ, कणकवली आणि कडावल या सहा वनपरिक्षेत्रांचे वनपरिक्षेत्र अधिकारी कृती दलाचे सदस्य असतील.

वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्याच्या दृष्टीने नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पाणीसाठ्यांची निर्मिती, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ४०० हून अधिक वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते स्थानिक स्तरावर साठविण्यास मदत होणार असून, वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाणी उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी वनाग्नीच्या घटना रोखणे आणि आग लागल्यास तिच्यावर तातडीने नियंत्रण मिळविणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, अग्निरेषांची निर्मिती व देखभाल, संवेदनशील वनक्षेत्रांमध्ये नियमित गस्त आणि आग नियंत्रणासाठी तातडीची कार्यवाही करण्यात येणार आहे. वनाग्नीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास, नैसर्गिक खाद्यस्रोत आणि जैवविविधतेचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता घेण्यात येणार आहे.

वनक्षेत्रातील नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांची उपलब्धता कायम राखण्यासाठी गवताळ भागांचे संवर्धन, खाद्य वनस्पतींचे संरक्षण आणि नैसर्गिक वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच अन्न व पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल.

या कृती दलामार्फत वनपरिक्षेत्रनिहाय पाण्याच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. जलसंधारणाची कामे, पाणीसाठ्यांची निर्मिती, वनाग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी तसेच नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांची स्थिती यांचे नियमित निरीक्षण केले जाणार आहे. वन्यजीवांचे संरक्षण, नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन आणि संभाव्य पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना आवश्यक नैसर्गिक संसाधने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सावंतवाडी वन विभागाने हा पुढाकार घेतला आहे.