मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी; पालघरमधील चौघांना अटक

 चोरीचा २४ तासांत छडा; ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चिपळूण (प्रतिनिधी) : सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीच्या तीन बॅटऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम पोलिसांनी पकडलेले बॅटरी चोरटे. ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीच्या या गुन्ह्यातील संशयित वाहन आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शासकीय वाहनाने रत्नागिरी ते चिपळूण विभागात पेट्रोलिंग करत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्याच्या पुढे एका धाब्याबाहेर सदर गुन्ह्यातील संशयित वाहन उभे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत वाहनाची खात्री केली असता वाहनामध्ये चार संशयित आढळून आले. जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (३२, रा. विरार पूर्व, गणपती मंदिर या शेजारी, जि. पालघर), नवनाथ भगवान उतेकर (३६, रा. साईनाथ, साई सावली अपार्टमेंट, विरार पूर्व, जि. पालघर), कौशिक प्रभाकर जाधव (२७, रा. येसूबाई कंपाऊंड, सिद्धिविनायक बी विंग, विरार, जि. पालघर), मंगेश मनोज गुरव (२०, रा. मोरेगाव तलाव, नालासोपारा, जि. पालघर) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईल टॉवरच्या तीन बॅटऱ्या आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत चोरीस गेलेल्या तीन मोबाईल टॉवर बॅटऱ्या, ज्यांची किंमत २२ हजार ५०० रुपये आहे, तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि वाहन असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल सावर्डे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहेत. कारवाईतील पोलीस पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत, अतुल कांबळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या तत्पर कारवाईमुळे मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरीच्या गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.