आचरा समुद्रकिनाऱ्यावर वाळूत फसली पर्यटकांची कार!

टेम्पोच्या सहाय्याने दोरी बांधून कार काढली सुखरूप बाहेर; मुजावर आणि मित्रमंडळाच्या तत्परतेचे कौतुक

आचरा प्रतिनिधी :
आचरा येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अनपेक्षित अडचणीचा सामना करावा लागला. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली चारचाकी कार थेट वाळूत उतरवली होती. मात्र, किनाऱ्यावरील मऊ व भुसभुशीत वाळूमध्ये कारची चाके रुतल्याने कार जागेवरच फसली. कार बाहेर काढण्यासाठी पर्यटकांनी प्रयत्न केले, मात्र वाळूमध्ये चाके अधिक रुतत असल्याने कार बाहेर काढणे कठीण झाले. त्यामुळे काही काळ पर्यटकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

पर्यटकांची ही अडचण लक्षात येताच आचरा ग्रामपंचायत सदस्य
मुजफ्फर मुजावर यांनी आपल्या मित्रमंडळासह तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. केवळ परिस्थिती पाहून न थांबता त्यांनी प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येत कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. यासाठी आपल्या टेम्पोचा उपयोग करण्याचे ठरवून दोरीच्या सहाय्याने वाळूत फसलेल्या कारला टेम्पोशी जोडण्यात आले. त्यानंतर योग्य समन्वय साधत टेम्पोच्या सहाय्याने कार हळूहळू खेचण्यात आली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि वाळूत फसलेली कार सुखरूप बाहेर काढण्यात आली.

अचानक उद्भवलेल्या या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. अनोळखी पर्यटक अडचणीत असताना कोणतीही वेळ न दवडता मदतीसाठी धावून जाण्याची मुजफ्फर मुजावर आणि त्यांच्या मित्रमंडळाची भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, आचरा समुद्रकिनारा पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण असल्याने सुट्टीच्या दिवशी तसेच पर्यटन हंगामात येथे पर्यटकांची वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यावरील मऊ वाळूवर चारचाकी वाहने नेल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते. वाहनांची चाके वाळूत रुतल्यास वाहन बाहेर काढताना अधिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेताना विशेष खबरदारी घ्यावी आणि शक्यतो मऊ वाळूत वाहने नेणे टाळावे, असे आवाहन या घटनेच्या निमित्ताने होत आहे.

पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना अडचणीच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुज्जफर मुजावर आणि त्यांच्या मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.