६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा मालवणात शुभारंभ !

नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन

२९ नोव्हेंबरपर्यंत मामा वरेरकर नाट्यगृहात रंगणार विविध नाट्यप्रयोग

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मालवण केंद्रावरील प्राथमिक फेरीला गुरुवार, १९ नोव्हेंबरपासून उत्साहात प्रारंभ झाला. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक संजय शिंदे, परीक्षक डॉ. विशाखा शिरवाडकर, डॉ. शशिकांत चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र आंगणे, भजनसम्राट भालचंद्र केळूसकर, अखिल भारतीय नाट्य परिषद मालवण शाखाध्यक्ष प्रकाश कुशे, नाट्य समीक्षक विनायक कोळंबकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, शिवराज मंच मालवणचे भूषण साटम, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजू बिडये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्पर्धा समन्वयक संजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या समाजप्रबोधनाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रंगभूमीच्या माध्यमातून कलावंत करत आहेत. हा रंगभूमीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आजचे हौशी कलाकार निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्यरत आहेत. या स्पर्धेत सादर होणारी प्रत्येक कलाकृती नाट्यरसिकांच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन सोहळ्यानंतर ‘विकेटकीपर’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या स्पर्धेत २९ नोव्हेंबरपर्यंत विविध नाट्यसंस्थांची नाटक सादर होणार आहेत. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात रंगणाऱ्या या नाट्यप्रयोगांचा आस्वाद नाट्यरसिकांना घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय सातार्डेकर यांनी आभार मानले.