सुमारे साडेनऊ हजारांचा मुद्देमाल जप्त
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा चेकपोस्ट येथे बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून यामध्ये सुमारे नऊ हजार ६०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
आयवान संतान फर्नांडिस (वय ३३, रा. आरोंदा बाजारपेठ, ता. सावंतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परवान्याशिवाय गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला. याप्रकरणी आरोंदा पोलीस दूरक्षेत्र येथे नेमणुकीस असलेले फिर्यादी बाबुराव नकुळ (वय ४३) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कारवाईदरम्यान एका प्लॅस्टिकच्या गोणीत दोन पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोल्डन एस ब्ल्यू असे इंग्रजीत लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या १८० मिली मापाच्या प्रत्येकी ४८ बाटल्या याप्रमाणे एकूण ९६ सिलबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत शंभर रुपये याप्रमाणे एकूण नऊ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरोधात यापूर्वीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २५१/२०२१, ३३७/२०२३ आणि २०१/२०२४ असे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. या नव्या प्रकरणात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३१०/२०२६ अन्वये कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बीएनएसएस ३५ (३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरवारी हे करत आहेत.













