दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन लागू करावी

राष्ट्रीय दिव्यांग पार्टीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी 

माडखोल । लखन आडेलकर : राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा ६,००० रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या मागणीबाबत मुख्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण मंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय कळवण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे अत्यंत सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले. दिव्यांग बांधवांच्या पेन्शन वाढीच्या मागणीसंदर्भात आपण प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि दिव्यांग कल्याण मंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करू आणि सरकारकडून सहकार्य करण्याबाबत योग्य तो निर्णय कळवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनात दिव्यांग बांधवांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वाढत्या महागाईच्या काळात राज्यातील दिव्यांग नागरिकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. दैनंदिन गरजा, नियमित औषधोपचार आणि सन्मानाने जगण्यासाठी लागणारा खर्च भागवणे दिव्यांग लाभार्थ्यांना कठीण जात आहे. सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असून ते मूलभूत गरजा पूर्ण करण्यास अपुरे ठरत आहे. अनेक दिव्यांग नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ च्या तरतुदीनुसार दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांच्या मानधनात भरीव वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या शिष्टमंडळात राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मनोज सातोसे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.