घोडगेवाडी पूर दुर्घटना: पीडित कुटुंबाला आमदार दीपक केसरकर य देणार मदतीचा हात

​सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी येथील पुलावरून पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे झारखंड येथील एक तरुण आणि एक सहा वर्षांचा चिमुकला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला असून, पीडित कुटुंबाला वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच ते या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मदत सुपूर्द करणार आहेत.

​शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी या घटनेबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. या दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले असून, शोधमोहिमेदरम्यान सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. मात्र, बेपत्ता तरुणाचा लगतच्या नदीपात्रात शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.

​पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी आमदार केसरकर यांनी वैयक्तिक सहाय्यासोबतच शासकीय स्तरावरूनही मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत त्यांनी दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांच्याशी चर्चा केली असून, सरकारी नियमांच्या चौकटीत राहून प्रशासकीय मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असताना ग्रामस्थांनी धोका न पत्करता सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.