अद्वैत नेवगी हे ‘रिव्हर्स मायग्रेशन’चे उत्तम उदाहरण; पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक

सावंतवाडीतील अद्वैत बेक हाऊसला सदिच्छा भेट देत चाखला आईस्क्रीमचा स्वाद !

​सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा ताफा आज सावंतवाडीत अचानक थांबला आणि त्यांनी येथील ‘अद्वैत बेक हाऊस’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी येथील आईस्क्रीम, केकसह विविध पदार्थांची चव चाखली व अद्वैत नेवगी याच्या उद्यमशीलतेचे भरभरून कौतुक केले. अद्वैत हा ‘रिव्हर्स मायग्रेशन’चे अतिशय उत्तम उदाहरण असून स्थानिक युवकाने निर्माण केलेला हा ब्रँड निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्गार मंत्री श्री. राणे यांनी यावेळी काढले.


​या अनपेक्षित भेटीदरम्यान अद्वैतचे वडील वल्लभ नेवगी यांनी पालकमंत्र्यांच्या या सरप्राईज व्हिजिटबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्यासोबतच्या जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांना उजाळा दिला. त्यावर भाष्य करताना, आता पुढची पिढी देखील हे स्नेहाचे संबंध तितक्याच आपुलकीने कायम ठेवत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.

​यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील तरुणांनी पुन्हा आपल्या जिल्ह्यात येऊन येथील अर्थकारणाला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आम्ही नेहमी सांगतो. इथली खाद्यसंस्कृती आणि भाषा यांना चालना देण्याचे काम तरुणांनी केले पाहिजे आणि अद्वैत हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावर आणि अनेक मोठ्या व्यक्तींकडून अद्वैतच्या कामाचे कौतुक ऐकले होते. आज प्रत्यक्ष येथे येऊन पदार्थांची चव घेतल्यानंतर, मुंबई आणि पुण्यालाही मागे टाकेल इतके दर्जेदार उत्पादन तो बनवत असल्याची खात्री पटली. त्याच्या पाठीशी आई-वडिलांचे खंबीर आशीर्वाद असून, महाराष्ट्रासह देशभरातील खवय्यांनी अद्वैत बेक हाऊसला नक्की भेट द्यावी, असे आवाहनही श्री. राणे यांनी यावेळी केले.

​या सदिच्छा भेटीप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले, वल्लभ नेवगी, वैभवी नेवगी, अद्वैत नेवगी, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.