२२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सहा एक्स्प्रेस गाड्या नियंत्रित; दोन गाड्या दोन तास उशिराने सुटणार
देवगड : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर विद्युतविषयक कामांसाठी २२ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामाचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. या कालावधीत सहा गाड्या निर्धारित ठिकाणी काही मिनिटांसाठी नियंत्रित करण्यात येणार असून, दोन गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत दोन तासांचा बदल करण्यात आला आहे.
या सहा गाड्या मार्गात नियंत्रित होणार
1) गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ही २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी आपटा स्थानकावर ५० मिनिटे नियंत्रित करण्यात येणार आहे.
2) गाडी क्रमांक २०११२ मडगाव-मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस ही २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी सोमटणे स्थानकावर १० मिनिटे नियंत्रित करण्यात येणार आहे.
3) गाडी क्रमांक २२११४ तिरुवनंतपुरम नॉर्थ-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस ही २३ नोव्हेंबर रोजी आपटा स्थानकावर १०९ मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे.
4) गाडी क्रमांक २२१४९ एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस ही २४ आणि २७ नोव्हेंबर रोजी आपटा स्थानकावर १०९ मिनिटे नियंत्रित करण्यात येणार आहे.
5) गाडी क्रमांक २२६५५ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्स्प्रेस ही २५ नोव्हेंबर रोजी आपटा स्थानकावर ६० मिनिटे नियंत्रित केली जाणार आहे.
6) गाडी क्रमांक २२६५३ तिरुवनंतपुरम सेंट्रल-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही २८ नोव्हेंबर रोजी आपटा स्थानकावर १०९ मिनिटे नियंत्रित करण्यात येणार आहे.
दोन एक्स्प्रेस गाड्या दोन तास उशिराने सुटणार
पॉवर ब्लॉकमुळे दोन गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
1) गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस ही २४, २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निर्धारित वेळेपेक्षा १२० मिनिटे म्हणजेच दोन तास उशिराने सुटणार आहे.
2) गाडी क्रमांक २२११५ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी सुपरफास्ट एक्स्प्रेस ही २६ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन तास उशिराने सुटणार आहे.













