विजयदुर्ग किनारपट्टीवरील स्फोटाचे गुढ उलगडले
देवगड / प्रतिनिधी
विजयदुर्ग ते राजापूर-नाटेपर्यंतच्या खोल समुद्रात शनिवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या स्फोटासारखे ऐकू आलेले आवाज हे मोठ्या जहाजावरून (टग बोट) करण्यात आलेल्या ‘सिग्नल फायर’चे असल्याची माहिती कोस्टगार्ड व पोलीस प्रशासनाच्या प्राथमिक तपासावरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच किनारपट्टी भागातील संशयास्पद बाबींची माहिती सतर्कतेने सुरक्षा यंत्रणांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आले.
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग ते रत्नागिरी जिल्हयातील राजापूर- नाटेपर्यंतच्या खोल समुद्रपट्ट्यात शनिवारी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या स्फोटासारखे आवाज किनारपट्टी भागातील स्थानिक नागरिकांना ऐकू आले. स्फोटासारख्या आवाजानंतर आकाशात ज्वाला दिसल्याचे काहींनी सांगत ते मिसाईल असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. सुरक्षा यंत्रणांच्यावतीने समुद्रात ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आले. कोस्टगार्डसह सागरी सुरक्षा दलाच्यावतीनेही समुद्रात गस्त घालण्यात आली. विजयदुर्ग ते नाटे परिसरातील समुद्र किनारी लॅण्डींग पॉईंटवरही पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदोबस्त वाढविण्यात आला. दरम्यान, शनिवारी रात्रीच्या सुमारास खोल समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या जहाजावरून ‘सिग्नल फायर’ करण्यात आले होते, अशी शक्यता कोस्टगार्डने वर्तविली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.











