आचरा-अर्जुन बापर्डेकर
तोंडवळी वरची येथील श्री देव वाघेश्वर मंदिरात सोमवार, *दिनांक २३ नोव्हेंबर २०२६* रोजी *त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य उत्सव* मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. *सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत* विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता धार्मिक पूजा व विधी झाल्यानंतर श्री देवाची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू राहील. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता हळदी-कुंकू समारंभ, तर ७ वाजता स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने सादर केली जाणार आहेत. रात्री १२ वाजता दीपोत्सव व त्यानंतर आरती होणार आहे. विशेष सूचना अशी की, कालनिर्णय दिनदर्शिकेमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दर्शविण्यात आली असली, तरी श्री देव वाघेश्वर मंदिरात हा उत्सव सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजीच साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी व हितचिंतकांनी या उत्सवात सहकुटुंब सहभागी होऊन श्री देव वाघेश्वराचे दर्शन, महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.













