सुनिता गांवकर यांचे निधन
कणकवली : वरिष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या मातोश्री सुनिता साबाजी गांवकर (वय ८६, रा. नाडकर्णी नगर, कलमठ, कणकवली) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सुनिता गांवकर यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील कराची (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला होता. भारत – पाकिस्तान फाळणीच्या झळा त्यांनी बालवयातच सोसल्या होत्या. फाळणीनंतर भारतात आल्यानंतर सुरुवातीला काही काळ बोरिवली येथील जंगलसदृश भागात त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उल्हासनगर येथील बॅरॅकमध्ये हलविण्यात आले. त्यांचे बालपण आणि तरुणपण याच ठिकाणी गेले.
विवाहानंतर त्या मुंबईत वास्तव्यास आल्या. मात्र, त्यांना आपल्या मूळ गाव दिगवळेची विशेष ओढ होती. त्यामुळे त्या पतीसमवेत वारंवार दिगवळे येथे येत असत. पुढे त्यांनी नाडकर्णी नगर, कलमठ येथे स्वतःचे घर बांधण्याचा आग्रह धरला आणि तेथेच स्थायिक झाल्या. विविध खाद्यपदार्थ तयार करणे, नवनवीन पदार्थ शोधणे आणि ते इतरांना आवडीने खाऊ घालणे हा त्यांचा विशेष छंद होता. कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून त्या कुटुंबात परिचित होत्या. त्यांच्या निधनाने गांवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, नातसुना आणि पतवंडे असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ९ वाजता कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.













