दोडामार्ग (सुहास देसाई )
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी महाराष्ट्र आणि गोवा शासनाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी आंतरराज्य जलसंपदा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी मुख्य धरण, जलविद्युत प्रकल्प, सॅडल डॅम तसेच धरणाच्या जलाशयाची पाहणी केली. वन विभागाच्या ‘सिंधुरत्न’ योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उघड्या व्हॅनद्वारे त्यांनी तिलारी जंगल परिसरात सफारीचा आनंद घेतला. येथील निसर्गसंपदा, जलाशय आणि जंगल सफारी पाहून मुख्य सचिव भारावून गेले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तिलारी धरणातून गोव्याला होणारा पाणीपुरवठा तसेच स्थानिक शेती व बागायतीसाठी उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे या भागात हरितक्रांती घडून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या परिसरातील जंगल भ्रमंतीमुळे प्राणिप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
या दौऱ्यात मुख्य सचिवांसमवेत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक रेड्डी, अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता योगेश पाटील, उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार राहुल गुरव आणि वन विभागाचे वनक्षेत्रपाल पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.













