चंपक मैदानाबाहेर दुचाकीच्या धडकेत मुलगी जखमी; ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील चंपक मैदान येथील फन फेअरमधून बाहेर पडणाऱ्या कच्च्या रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवत लहान मुलीला धडक दिली. त्यात ती जखमी झाली. ग्रामीण पोलिस ठाण्यात चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद कैफ इक्बाल मुल्ला ( २३, रा. प्लॉट नं. १३, समीरा अपार्टमेंट, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवार 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वा.सुमारास घडली. मैत्रेयी निलेश आंबेकर (११, रा. गणाधीश अपार्टमेंट, फाटक हायस्कूलजवळ, गाडीतळ, रत्नागिरी) असे जखमी मुलीचे नाव आहे. संशयित चालक मोहम्मद मुल्ला हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन चंपक मैदान येथील फन फेअरमधील पार्किंगमधून बाहेर पडत होता. त्याने आपल्या मित्राला दुचाकीवर मागे बसवून कच्च्या रस्त्याने जाताना निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून रस्त्यावरून पायी जाणाऱ्या मैत्रेयी आंबेकर हिला धडक दिली. या अपघातात ती जखमी झाली. याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.