मसुरे | झुंजार पेडणेकर :
गेली २६ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू व वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या कांजूरमार्ग पूर्व येथील ‘एक सेवाभावी संस्था’ यांच्या वतीने यंदाही जागतिक बालदिनाचे औचित्य साधून ‘औचित्य बालदिनाचे’ हा विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागेवाडी येथील आदिवासी पाड्यात असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, पाटी, पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तके, खेळण्यांचे साहित्य तसेच खाऊ अशा विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि बालपणातील आनंद अधिक द्विगुणित व्हावा, या उदात्त हेतूने संस्थेने हा उपक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सेवाभावी सभासद तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या सहकार्याने आणि उत्स्फूर्त सहभागाने हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
‘मुलांच्या हातात शैक्षणिक साहित्य देणे म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करणे!’ हा सेवाभावी विचार जपत ‘एक सेवाभावी संस्था’ने आपल्या सामाजिक कार्याची परंपरा यंदाही पुढे चालू ठेवल्या बद्दल कौतुक होत आहे.













