203 रक्तदात्यांनी केले रक्तदान, आयोजकांनी मानले आभार
संतोष कोत्रे
लांजा : रक्तदान हेच श्रेष्ठदान या ब्रीद वाक्यानुसार लांजातील शिवगंध प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. एकूण 203 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले समाजाप्रती कर्तव्य बजावले. जिल्ह्यात सर्वाधिक रक्तसंकलन” झालेले हे शिबिर ठरले आहे.
रक्तदानाविषयी लोकांच्या मनातील असणारे गैरसमज व भीती दूर व्हावी या उद्देशाने शिवगंध प्रतिष्ठानच्यावतीने कै.अद्वैत जाधव याच्या स्मृतीप्रित्यर्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील संकल्पसिध्दी सभागृहात आयोजित या शिबीरात एकूण 203 रक्तदात्यांनी रक्तदान केले. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून एकप्रकारे अनोखा विक्रम रचला आहे. जिल्हा शासकीय रक्तपेढी, रेडक्रॉस रक्तपेढी आणि श्री स्वामी समर्थ रक्तपेढी, सावर्डे यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.यावेळी शिवगंध संस्थेतर्फे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देत गौरव करून आभार व्यक्त करण्यात आले.
या शिबिराला जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, नागरी संरक्षण उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, तहसीलदार प्रियंका ढोले, कृषी अधिकारी संतोष म्हेत्रे, माजी नगराध्यक्ष सुनील उर्फ राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, लांजा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे, लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, अभिजित राजेशिर्के, शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक नागेश कुरूप, काँग्रेसचे पदाधिकारी महेश सप्रे, शिवसेना पदाधिकारी राजू धावणे, चेतन खंदारे, स्वरूप गुरव आणि समीर सावंत आदींसह
400 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष सदिच्छा भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
रक्तदात्यांच्या या उत्साहामुळे अनेक गरजूंना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे यापुढेही आपले हे सामाजिक कर्तव्य असेच चालू ठेवण्याचा संकल्प शिवगंध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवगंध प्रतिष्ठानच्या राजू जाधव व सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.













