तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
वेंगुर्ले : दाजी नाईक
सन २०२६-२७ मध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. विविध तांत्रिक अडचणींमुळे वेंगुर्ला तालुक्यातील जवळपास ५५० शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळी जाहीर झाला असल्याने नुकसानग्रस्त शासनाने त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत आज २३ नोव्हेंबर रोजी तहसीलदार वेंगुर्ला यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अर्ज केले आहेत. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्याची कार्यवाही करण्यात आली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.
काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे अर्ज प्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे पुढाकार घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी मार्गाने अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.बीशेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट झाली असून, भातपिकाचे नुकसान झाल्याने त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि कोणताही शेतकरी केवळ तांत्रिक अडचणींमुळे शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कृषी विभाग व महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज निवेदन देताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या सह रमाकांत धोंडू परब, दिलीप नाईक, घनश्याम शेटकर, रघुनाथ मांजरेकर, देवदत्त जुवलेकर, उदय गावडे, महेश प्रभुखानोलकर, कृष्णा परब, प्रवीण नाईक, प्रभाकर सावंत, संजय आरोसकर, अभिजीत परब, मोहन सावंत यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.













