रस्त्याच्या कामावरून वाद पेटला; फावड्याने तिघांना मारहाण

टेरव येथील धक्कादायक प्रकार; एकविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव तांदळेवाडी येथे अंगणात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने तिघांना फावड्याने मारहाण केल्याची घटना रविवारी दि. २२ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत शिवाजी नारायण म्हालीम, राजेंद्र म्हालीम आणि काशीराम म्हालीम हे तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजी नारायण म्हालीम (४५, व्यवसाय वेल्डर, रा. टेरव-तांदळेवाडी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संजय सिताराम म्हालीम (४७, रा. टेरव तांदळेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी म्हालीम, राजेंद्र म्हालीम आणि काशीराम म्हालीम हे तिघे रस्त्याचे काम करीत असताना संजय म्हालीम घटनास्थळी आला. ‘तुम्ही अंगणात रस्ता का बांधत आहात? हा आमच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे,’ असे सांगत त्याने आक्षेप घेतला. यावरून वादावादी झाली. या वादातून संजय म्हालीम याने घटनास्थळी असलेले फावडे उचलून त्या तिघांच्या हातावर, पायावर आणि दंडावर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेतील जखमी शिवाजी म्हालीम यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या एमएलसी अहवालानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत शिवाजी म्हालीम, राजेंद्र म्हालीम आणि काशीराम म्हालीम हे तिघे जखमी झाले आहेत. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.