संविधानिक हक्कासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा 25 नोव्हेंबरला मुंबईत एल्गार !

रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो अधिकारी/ कर्मचारी सहभागी होणार- जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे यांची माहिती

लांजा ( प्रतिनिधी): पदोन्नतीतील आरक्षण, जुनी पेन्शन, रिक्त पदे, शिक्षकांच्या सुधारित संच मान्यता, अशा विविध मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघा च्या वतीने दि. 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे
मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे मार्गदर्शन आणि कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यस्तरीय एक दिवशीय धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनाकरिता रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो अधिकारी/ कर्मचारी व कार्यकर्ते मुंबईला रवाना होत असल्याची माहिती महासंघाचे अतिरिक्त सरचिटणीस तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी दिली.
महासंघाने व शिक्षक संघटनेने शासनाकडे वारंवार निवेदने देऊन बैठका घेऊन आणि विविध आंदोलने करून पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेक पात्र अधिकारी/कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत. केंद्र शासनाने १५ जून २०१८ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाने यापूर्वी २९ डिसेंबर २०१७ रोजीचे काढलेले परिपत्रक आणि ७ मे २०२१ रोजी चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नती द्यावी, असा ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे.
१)संविधानातील अनुच्छेद १६(४- अ),१६(४- ब)व ३३५ मधील तरतुदीनुसार पदोन्नतीतील आरक्षण तातडीने लागू करावे.२) राज्यातील सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी.३) मागासवर्गीय यांच्या पदोन्नती व सरळ सेवा भरतीतील २.५ लाखाचा अनुशेष तातडीने भरावा.४) वाहन चालक, परिचर व चतुर्थश्रेणी संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरणा करावी.५) जुना आकृतीबंध लागू करणे.६) वेतन त्रुटी दूर कराव्यात.७) जुन्या शिक्षकांना टीईटी मधून वगळण्यात यावे.८) प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुधारित संच मान्यता मधील अडचणी दूर कराव्यात. ९) शिक्षकांच्या बदली धोरणात पारदर्शकता आणावी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व डाटा ऑपरेटर ही आवश्यक पदे भरण्यात यावीत.कोकणातील शैक्षणिक नवीन मापदंड निर्माण करावा.१०) कंत्राटी नोकर भरती धोरण शासनाने रद्द करावे.
अशा विविध मागण्याकरीता कास्ट्राईब महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना यांनी संयुक्त धरणे आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाकरिता रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडे कार्यकर्ते कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांचे नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.