पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या ‘स्वामी गीतगंगा’ गीतसंग्रहाचे २६ रोजी प्रकाशन

पेडणे (प्रतिनिधी) : मोरजी येथील पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीभावनेतून रचलेल्या ‘स्वामी गीतगंगा’ या गीतसंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता शिवोली येथील राय स्वामी समर्थ मठात आयोजित करण्यात आला आहे. स्वामी समर्थ परिवार मठ यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, प्रसिद्ध रंगकर्मी तथा डिचोली अर्बन बँकचे चेअरमन विठ्ठल प्रभू देसाई आणि श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष निलेश वेर्णेकर उपस्थित राहणार आहेत.

 

पत्रकारितेबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे निवृत्ती शिरोडकर यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी भक्तिभाव अर्पण करत ‘स्वामी गीतगंगा’ या गीतसंग्रहाची निर्मिती केली आहे. या गीतसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील आणखी एका महत्त्वपूर्ण पर्वाची सुरुवात होत आहे.

 

भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा संगम असलेल्या या गीतसंग्रहाचे प्रकाशन स्वामी भक्तांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी, स्वामी भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक स्वामी समर्थ परिवार मठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.