चोरीस गेलेला ब्रेकर पुणे येथून हस्तगत; साखरपा पोलिसांची धडक कारवाई

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा ते खाडिकोळवण रस्त्याच्या दुपदरीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारा चार लाख रुपये किमतीचा ब्रेकर चोरीस गेल्याप्रकरणी साखरपा पोलिसांनी तपास करत तो पुण्यातून हस्तगत केला आहे. या कारवाईत चोरीचा ब्रेकर खरेदी करणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

१२ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्याने हा ब्रेकर चोरून नेला होता. या संदर्भात १५ नोव्हेंबर रोजी साखरपा पोलिस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत चोरीचा छडा लावला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, विकास राय (वय अंदाजे २५) याने भाड्याच्या पिकअप गाडीतून हा ब्रेकर सोन सांगवी, पुणे येथे नेऊन विकल्याचे समोर आले. मोबाईल सीडीआरच्या आधारे तपास केला असता आरोपी विकास राय हा मूळ गावी बिहार येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सोन सांगवी, पुणे येथून चोरीस गेलेला ब्रेकर जप्त केला असून तो खरेदी करणारा अरविंद यादव (वय अंदाजे २१) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत. पसार असलेल्या मुख्य आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.