संगमेश्वर (प्रतिनिधी) : सामायिक जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या तणावाची ठिणगी तुळशी विवाह कार्यक्रमादरम्यान पडून आरवली गुरववाडी (ता. संगमेश्वर) येथे नातेवाईकांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही बाजूंचे मिळून पाच जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात सामायिक जमीन-जागेवरून वाद सुरू असून ते न्यायप्रविष्ट आहेत.
पहिली घटना (गु.र.नं. १५२/२०२६) :
२२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सागर अनंत गुरव (वय ३१) हे घरासमोरील तुळशी वृंदावनात तुळशी विवाहाची तयारी करत असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून तिथे येत बाचाबाची व शिवीगाळ केली. ‘तुळशीचे लग्न पार पडू दे, मग चर्चा करू’ असे सांगितल्यावर वाद चिघळला. यामध्ये लोखंडी पाईप, हाताचे थापड व बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत प्रकाश तुकाराम गुरव (वय ३८), संदीप तुकाराम गुरव (वय ३७) आणि रोशन गजानन गुरव (वय २८) हे जखमी झाले. सागर गुरव यांच्या फिर्यादीवरून अनिकेत सुभाष गुरव यांच्यासह १४ जणांविरुद्ध २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना (गु.र.नं. १५३/२०२६) :
त्याच दिवशी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास मूळ घराच्या ठिकाणी पूजा व तुळशी लग्नाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या गटाने बेकायदेशीर जमाव करून शिवीगाळ व वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत स्वप्नील जयसिंग गुरव (वय ४०) आणि शैलेश जयसिंग गुरव (वय ३८) हे जखमी झाले. सुभाष जयसिंग गुरव (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर अनंत गुरव यांच्यासह २९ जणांविरुद्ध २३ नोव्हेंबर रोजी पहाटे २.१४ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संगमेश्वर पोलीस या दोन्ही परस्परविरोधी प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या आरवली गुरववाडीत तुळशी विवाह सोहळ्यादरम्यान नातेवाईकांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल













