शिरंबवली व नांदिवली येथे एसटीच्या एन सी एम सी कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील दर्शना सावंत यांच्या पुढाकारातून
शिबिराचे आयोजन;

लांजा( प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरंबवली गावच्या पोलीस पाटील दर्शना सावंत यांच्या पुढाकारातून
आयोजित केलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) नोंदणी शिबिराला नांदिवली आणि शिरंबवली या दोन्ही गावातील ज्येष्ठ नागरिक व लाभार्थी ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शिरंबवली गावच्या पोलीस पाटील दर्शना दिगंबर सावंत यांच्या पुढाकारातून शिरंबवली व नांदिवली येथे NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या नियोजन व समन्वयातून दोन्ही गावांमध्ये हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिराच्या आयोजनासाठी पोलीस पाटील दर्शना सावंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन लांजा एसटी डेपो मॅनेजर प्रकाश झोरे, तसेच अन्य अधिकारी यामध्ये
श्री. चव्हाण, श्रीम. वाझे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्यात आला. त्यांच्या सहकार्याने शिबिराची तारीख, ठिकाण आणि संपूर्ण नियोजन निश्चित करून दोन्ही गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरामध्ये महिलांसह पात्र ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिलांनी सहभाग नोंदवून एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या कार्ड नोंदणीचा लाभ घेतला.
शिरंबवली येथे अंगणवाडी शाळेमध्ये, तर नांदिवली येथे संतोष पांचाळ यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत शिबिर घेण्यात आले. शिबिराची माहिती गावातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आशा सेविका नंदिनी चव्हाण, दोन्ही गावांतील अंगणवाडी सेविका अश्विनी सरपोतदार व अंजली चव्हाण, तसेच शिरंबवली येथील अंगणवाडी मदतनीस श्रेया सावंत यांनी विशेष सहकार्य केले.

याशिवाय रघुवीर सावंत, चंद्रकांत सावंत, शुभम शिंदे, संतोष पांचाळ, पूजा कांबळे व योगिता सनगले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

शासकीय योजनांची माहिती केवळ कागदोपत्री न राहता तिचा प्रत्यक्ष लाभ गावातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून पोलीस पाटील दर्शना दिगंबर सावंत यांनी घेतलेला पुढाकार ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. सर्वांच्या सामूहिक सहकार्यामुळे दोन्ही गावांतील शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.