तळवडे गावचा सुपुत्र शुभम कोकरे झाला डॉक्टर!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर BAMS पदवी संपादन
 सामान्य कुटुंबातील मुलाच्या यशाने कोकरे कुटुंबासह तळवडे गावाचा गौरव

चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित कौटुंबिक परिस्थिती आणि शिक्षणातील अनेक आव्हानांवर मात करीत तळवडे धनगरवाडी येथील शुभम वैशाली धोंडीराम कोकरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अंतर्गत बी.ए.एम.एस. (BAMS) ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या यशामुळे कोकरे कुटुंबीयांसह तळवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शुभम यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुटरे येथे झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय, सावर्डे येथे पूर्ण केले. अकरावी व बारावीचे शिक्षण श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड येथे घेतले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शुभम यांनी घरीच राहून राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) परीक्षेची तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी सन २०२१ मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, ईश्वरपूर, जि. सांगली येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. तेथील अभ्यासक्रम पूर्ण करीत त्यांनी बी.ए.एम.एस. ही पदवी संपादन केली आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. शुभम यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि संस्कार यांचा मोठा वाटा आहे. त्यांची आई सौ. वैशाली धोंडीराम कोकरे या गृहिणी असून वडील श्री. धोंडीराम बाबू कोकरे हे कुटरे येथील जे. वाय. शिर्के हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून आलेल्या शुभम यांनी शिक्षणाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मुलाने डॉक्टर व्हावे, हे आई-वडिलांचे स्वप्न शुभम यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आनंद द्विगुणित झाला असून आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जिद्द, मेहनत आणि योग्य ध्येयाच्या जोरावर मोठी शैक्षणिक व व्यावसायिक उंची गाठता येते, याचे शुभम यांनी उदाहरण घालून दिले आहे.
शुभम कोकरे यांच्या या यशाबद्दल तळवडे, कुटरे, सावर्डे, खेड परिसरासह नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कुटुंबातून सुरू झालेला शुभम यांचा डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.