लांजा (प्रतिनिधी ): तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावामध्ये सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी श्री भैरी देवाच्या देवळात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी साजरी होणारी त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्या निमित्ताने देवाला रूप लागून पालख्या नाचविण्याची संधी मिळत असल्याने पंचक्रोशीतील भाविकांनी माचाळ गावच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. या निमित्ताने मुंबईकर चाकरमानी देखील गावात दाखल झाले होते .
रात्री देवाची पालखी नाचवतानाचा कार्यक्रम झाला. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये आणि श्री भैरी देवाच्या नावाचा जयघोष करत भाविक या पालखी नाचण्याच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अशाप्रकारे माचाळ गावची त्रिपुरारी पौर्णिमा मोठया जल्लोषात, उत्साहात पार पडली.













